डॉ.निर्मलाताई पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर.
महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांसाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नुकताच सांगलीच्या डॉ. निर्मलाताई पाटील यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
डॉ. निर्मलाताई पाटील गेल्या 30 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहेत. महिला व बालकांचे आरोग्य, त्यांचे समुपदेशन, महापूर व कोविड काळात दिलेली वैद्यकीय सेवा, विविध शाळा आणि संस्थांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि सल्ला, आरोग्य विषयक व्याख्यान अशा विविध स्तरावर त्या काम करीत आहेत.
गेल्या 22 वर्षापासून त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे. जिजाऊ ब्रिगेड सांगली शहराध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हा अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष या पदावर काम करीत असताना त्यांनी प्रबोधनाचे अनेक उपक्रम या संघटनांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवलेले आहेत. सध्या त्या जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष व जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर काम करीत आहेत.
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिकांचे संघटन,साहित्यनिर्मिती विषयक कार्यशाळा, साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकांना विविध पुरस्काराने सन्मानित करणे, गाव शिवार साहित्य संमेलनापासून ते अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाचे आयोजन असे विविध उपक्रम राबविले जातात. कोरोना काळात जगातील पहिले ऑनलाईन साहित्य संमेलन घेण्याचा मान ही परिषदेने मिळवलेला आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांचे संघटन, प्रबोधन केले जाते. महिला सक्षमीकरण, महिलांचे प्रश्न तिच्या पुढील आव्हाने,उपाय व संधी अशा विविध हेतूने जिजाऊ ब्रिगेड सध्या भारतभर व काही इतर राष्ट्रांमध्ये काम करीत आहे.
विविध विषयावर त्या लेखन ही करतात. *आद्य_* *महिला शिवचरित्रकार* हा सन्मानही त्यांना मिळालेला आहे. महिला सक्षमीकरण, सुजाण माता पालक, स्त्री -कालची, आजची, उद्याची, तरुणांपुढील आव्हाने व उपाय, महामानवांचे विचार आणि समाज परिवर्तन अशा अनेक विषयावर त्या महाराष्ट्रभर व्याख्यानाचे कार्यक्रम करीत असतात.
धार्मिक क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. अंधश्रद्धा, कालबाह्य रुढी, परंपरा यांना फाटा देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री पुरुष समानता, कालसुसंगत बदलावर आधारित शिवविवाहांचे शिवसेवक म्हणून त्या संस्कार करीत असतात. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक विवाहांचे यशस्वीपणे पौराहित्य त्यांनी केलेले आहे.
महिला शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम व्हावी. स्त्री पुरुष समानता समाजामध्ये प्रस्थापित व्हावी अशा सारख्या अनेक हेतूने त्या या क्षेत्रामध्ये काम करीत आहेत.
यापूर्वीही त्यांना काही संघटना आणि संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. महिला गौरव पुरस्कार, राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार,हिरकणी पुरस्कार यातील काही पुरस्कार आहेत. राष्ट्रीय मराठा सेवा संघाने त्यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष या पुरस्काराने दोन वेळा सन्मानित केलेले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर केलेला आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक सदिच्छा.